मुंबई- लोकसभा निवडणुका राज्यात चार टप्प्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली सभा चंद्रपूर येथे होणार आहे. वर्धा-चंद्रपूर या विदर्भातील लोकसभा मतदारसंघासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये ऐनवेळी बदल होऊ शकतो, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
राहुल गांधींची पहिली सभा चंद्रपुरात; राज्यात होणार ४ सभा - लोकसभा
लोकसभा निवडणुका राज्यात चार टप्प्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली सभा चंद्रपूर येथे होणार आहे.
चंद्रपूरसोबतच इतर तीन ठिकाणी राज्यात राहुल गांधी यांच्या सभा होणार असून शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे, अशी माहिती आज काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरात १ हजारहून अधिक सभांचा संकल्प केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ८ सभांसह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅली काढल्या जाणार आहेत.
काँग्रेसकडून राहुल गांधींच्या राज्यात फक्त ४ सभा होणार असल्याचे, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. या चार सभेपैकी पहिली सभा ही ५ एप्रिलला चंद्रपुरात होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी राहुल गांधींची प्रत्येकी एक सभा होईल, असेही सांगण्यात आले. राहुल गांधींच्या सोबतच प्रियांका गांधींच्याही सभा होण्याची शक्यता आहे.