मुंबई -दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही गुंडांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मारहाण केली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शैक्षणिक संस्थेत झालेल्या या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचाच हा आढावा.
पुणे - गरवारे महाविद्यालयातील युवा सेनेच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी मोदी-शाहंना विद्यार्थ्यांनी लक्ष केले होते.
मुंबई -चेहऱ्याला फडके बांधून लोक विद्यापीठात येतात आणि दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अशा गुंडांवर कारवाईदेखील करत नाही. हा प्रकार संशयास्पद असल्याचे मत, निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी वेळीच गुंडजांना ताब्यात घेतले असते तर, ही घटना घडली नसती असेही त्या म्हणाल्या.
मुंबई -जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ गेट ऑफ इंडियाजवळ सुरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजीसुद्धा केली आहे. "विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा माणुसकीला धरून नसून या गोष्टीचा मी निषेध करतो" असे मत आव्हाड यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलतानाव्यक्त केले.
हेही वाचा -जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण, देशभरात पडसाद; पाहा व्हिडिओ
औरंगाबाद -जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करत निषेध रॅली काढली. त्यानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शनेदेखील करण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून अभाविप वगळता सर्व विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत 'हम सब एक है'च्या घोषणा दिल्या. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचेही पहायला मिळाले.
नाशिक -राष्ट्रवादि युवक कांग्रेसने अभाविपच्या कार्यलबाहेर आंदोलन केले. दोन्ही संघटनाचे पदाधिकारी आमने-सामने आल्याने तनाव निर्माण झाला होता. राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. याचवेळी अभाविपचे कार्यकर्तेदेखील याठिकाणी दाखल झाल्याने दोनही संघटनाचे कार्यकर्ते एकमेमकांमध्ये भिडले होते. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सांगली -काँग्रेसच्या वतीने शहरात जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी हल्लेखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
धुळे - सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी, विद्रोही गीते सादर करून विद्यार्थ्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. अभाविपवर बंदी आणावी अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली आहे.