मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांना ऑक्सिजनचा साठा पुरवता यावा यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ही कार्यपद्धती सर्व रुग्णालयांनी तंतोतंत पाळावी असे सक्त निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. मुंबईतील सर्व संबंधित रुग्णालयांनी त्यांच्याकडे भरती असलेल्या रुग्णांच्या संख्येप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याबाबत योग्य ती दक्षता व जबाबदारी घ्यावी, ऑक्सिजन साठा कमी असल्याची माहिती २४ तास आधी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या घडल्या होत्या घटना
कोविड बाधित रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. शनिवार १७ एप्रिलला महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधून १६८ रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये युद्ध पातळीवर सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवार २१ एप्रिलला घाटकोपर येथील एच. जे. जोशी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपण्यास जेमतेम दीड तासांचा अवधी शिल्लक असताना रुग्णालयाने महानगरपालिकेला ही बाब कळवली. त्याही दिवशी महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा युद्ध पातळीवर कार्यवाही करून तत्परतेने व वेळेच्या आत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच मुंबईसाठी दैनंदिन गरजेपेक्षा अधिक आवश्यक असलेला ऑक्सिजन साठा अद्यापही उपलब्ध झालेला नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने एक कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे. ऑक्सिजन संदर्भात आणीबाणीची परिस्थिती वारंवार उद्भवणार नाही, यासाठी ही निश्चित कार्यपद्धती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.
ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यपद्धती
महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या कार्यालयात एक डेटा शीट तयार करून त्यामध्ये विभागनिहाय सर्व खासगी रुग्णालयांची माहिती प्रसिद्ध करावी. या तक्त्यामध्ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णालयांची नावे व त्यांना प्राणवायू पुरविणाऱ्या पुरवठादाराचे नाव, त्याचप्रमाणे सदर रुग्णालयामध्ये किती ड्यूरा, जंबो आणि छोटे प्राणवायू सिलेंडर उपलब्ध आहेत, याबद्दलची माहिती समाविष्ट करण्यात येईल. ही माहिती महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल. याव्यतिरिक्त विभाग कार्यालयात इतर रुग्णालय कार्यरत असतील तर त्याबाबतची माहिती विभाग कार्यालय अद्ययावत करतील व प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांना eemechsouth.me@mcgm.gov.in या ई-मेलवर अवगत करतील. ही सुधारीत माहिती विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल.
२४ तास आधी ऑक्सिजनची मागणी