मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद केल्यापासून मुंबईतीलच नव्हे तर, देशभरातील लोकांचे रेल्वेविषयक प्रश्न मांडण्याची हक्काची संधी आणि व्यासपीठ केंद्र सरकारने हिरावून घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा एकदा रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत सुरू करण्याची मागणी लावून धरू, अशी भूमिका मुंबई उत्तर-मध्य लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी मांडली आहे. विमानतळाच्या धर्तीवर मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचा विकास व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ईटीव्ही भारत समूहाचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांच्यासोबत केलेल्या एका खास चर्चेत त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि राष्ट्रीय समस्या यांवर आपले मत व्यक्त केले.
मुंबईतून दोन नेत्यांना रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही मंत्र्यांनी आणि मोदी सरकारने या आघाडीवर निराशाच केली, अशी टीका प्रिया दत्त यांनी केली आहे. विमानतळ ज्याप्रमाणे स्वच्छ चकचकीत आणि सर्व सुविधांनी युक्त असतात, त्याच पद्धतीने मुंबईतील लोकलचेही सर्व रेल्वे स्थानके असायला हवीत, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार करून रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात यावा. महिलांसाठी उत्तम दर्जाचे शौचालय प्रत्येक रेल्वे स्थानकावर असायला हवीत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिलांबद्दल राज्य सरकार संवेदनशील नसून राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासाठी जबाबदार असल्याची टीकाही प्रिया दत्त यांनी यावेळी केली.
प्रिया दत्त उत्तर-मध्य या मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरुद्ध त्यांची लढत आहेत. त्यानी २००५ ते २०१४ या काळात दोनदा लोकसभेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार विरोधी पक्षांचे आहेत. त्यामुळे पूनम महाजन यांच्या विरुद्ध निवडून येण्याची कितपत खात्री वाटते? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर 'आपण कोणतीही निवडणूक एक आव्हान म्हणूनच लढवतो. कोणतीही निवडणूक सोपी नसते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
'पूनम महाजन यांचे दोष दाखवून किंवा त्यांनी काय केलं नाही, हे सांगून मत मागणार नाही. तर, काँग्रेस सत्तेत आल्यावर काय करणार, हे सांगून मते मागणार आहोत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.