मुंबई- राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खासगी लॅबमधून चाचणी करणाऱ्या रुग्णांसाठी दर कमी केल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, त्यानंतरही कोरोना चाचणीसाठी जास्त दर आकारले जात असल्याने संबंधितांवर कारवाई करावी आणि त्यांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
सरकारच्या आदेशानंतरही चार हजार शुल्क आकारून कोरोना चाचणी नाही; मुंबईतला प्रकार
लालबाग येथील फ्रेंड सर्कल चॅरिटीबेल ट्रस्टने एका रुग्णाकडून कोरोना चाचणीसाठी ४ हजार रुपये आकारले आहेत. पैसे आकारुनही या रुग्णाची चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे या ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना संशयितांच्या चाचण्या वेळेवर केल्या जाव्यात म्हणून राज्य सरकारने खासगी लॅबना परवानगी दिली. या लॅबना ४,५०० रुपये शुल्क आकारावे असे सरकारने सांगितले होते. नुकताच हा दर कमी करून २,२०० रुपये करण्यात आला आहे. तर लॅबमध्ये थेट जाऊन चाचणी केल्यास २,५०० रुपये आकारावेत असे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतरही मुंबईकर नागरिकांची लूट होत आहे. लालबाग येथील फ्रेंड सर्कल चॅरिटीबेल ट्रस्टने एका रुग्णाकडून कोरोना चाचणीसाठी ४ हजार रुपये आकारले आहेत. पैसे आकारुनही या रुग्णाची चाचणी करण्यात आली नाही, अशी माहिती गलगली यांनी दिली.