मुंबई- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) खुलासा करण्यात आलेला आहे. 25 फेब्रुवारीला ती मोटार अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर आणून उभी करण्यात आली होती. जी सचिन वाझे याचा खासगी वाहन चालक चालवत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातून समोर आलेला आहे.
मोटार सचिन वाझेच्या घरात लावण्यात आली होती
17 फेब्रुवारीला हिरेन मनसुख याने विक्रोळी हायवेवर त्याची स्कॉर्पिओ ही मोटार पार्क केली होती. त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता सचिन वाझे याची मुंबईत भेट घेऊन त्यास मोटारीची चावी दिली होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेला आहे. यानंतर सचिन वाझेच्या खासगी चालकाने ती चावी घेऊन विक्रोळी हायवेवर लावण्यात आलेली हिरेन यांची मोटार घेऊन सचिन वाझेच्या ठाण्यातील साकेत इमारतीच्या परिसरात आणून उभी केली होती . यानंतर 19 फेब्रुवारीला ती गाडी सचिन वाझेच्या खासगी चालकाने मुंबई पोलीस आयुक्तालयात आणली होती. त्यानंतर पुन्हा ती गाडी ठाण्यातील साकेत सोसायटीमध्ये नेऊन उभी केली होती. 24 फेब्रुवारीपर्यंत ती गाडी सचिन वाझे याच्या इमारतीच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेली होती.
ती स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर पार्क केल्यानंतर सचिन वाझेचा खासगी चालक गाडीबाहेर येऊन दुसऱ्या गाडीत बसला होता. त्यानंतर बनावट नंबरप्लेट इनोव्हा गाडीवर लावून सचिन वाझे त्याच्या खासगी चालकासोबत घटनास्थळावरून निघून गेला होता, असेही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात समोर आलेला आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनबाबत सध्या तरी निर्णय नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण