मुंबई- कोरोनाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरही आता सरकारच्या सोबत आले आहेत. मात्र, त्याचवेळी कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत काम करताना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता खासगी डॉक्टरांनी 1 कोटीच्या आरोग्य विम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या काळात डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यास 3 नव्हे तर 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने राज्य सरकारकडे केली आहे.
खासगी डॉक्टरांना हवाय एक कोटींचा आरोग्य विमा; IMA ची राज्य सरकारकडे मागणी - आयएमएची राज्य सरकारकडे मागणी
केंद्र सरकारने डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा लागू केला आहे. या योजनेचा अभ्यास केला असता खासगी डॉक्टरांना काही अटींमुळे याचा लाभ मिळणे कठीण दिसत आहे, यामुळे आयएमएने खासगी डॉक्टरांना 1 कोटी रुपयांचा आरोग्य विमा सरंक्षण द्यावे ,अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारने डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा लागू केला आहे. या योजनेचा अभ्यास केला असता खासगी डॉक्टरांना काही अटींमुळे याचा लाभ मिळणे कठीण दिसत आहे ,असे म्हणत आयएमएने खासगी डॉक्टरांसाठी वेगळी मागणी ठेवली आहे. कोरोनासाठी काम करताना धोका खूप मोठा आहे. त्याचवेळी खासगी डॉक्टर भरमसाठ भाडे देत क्लिनिक चालवतात. महागड्या वैद्यकीय उपकरणांसाठी लाखोंचे कर्ज घेणाऱ्या डॉक्टरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांचा जर कोविड- 19 मुळे वा या कामादरम्यान मृत्यू झाला तर त्यांना 1 कोटी मिळावेत अशी मागणी नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
डॉक्टरांना नेहमीच रुग्णांच्या नातेवाईकांकडुन मारहाण होते. मारहाण करणाऱ्या दोषींना सध्या 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, हे आरोपी जामीन मिळवून सुटून मोकाट फिरत पुन्हा डॉक्टरांना धमकावतात. त्यामुळे डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांना 3 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करावी. जेणेकरून त्यांना जामीन मिळणार नाही, अशी ही मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही मागण्यांवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या मागण्या नक्कीच मान्य होतील,असा विश्वास ही त्यांनी दर्शविला आहे.