मुंबई PM Modi visit to Mumbai :पंतप्रधान मोदींनी विकासाची गंगा देशभर पोहोचवण्याचा संकल्प घेतला होता. त्याचा प्रत्यय आज मुंबईत आल्याचं त्यांनी सांगितलं. अटल सेतू उद्घाटनावेळी मोदी म्हणाले,"मुंबई तसंच मुंबई उपनगरातून येथे उपस्थित राहिलेल्या जनतेला माझा नमस्कार! अटल सेतू पुलाचा शिलान्यास करण्यासाठी मी जेव्हा 2014 साली मुंबईत आलो होतो. तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून सांगितलं होतं, की लिहून ठेवा देश बदलेल. देश पुढे जाईल. आजचा दिवस महाराष्ट्रसह विकसित भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबादेवीला नमन करून सिद्धिविनायकाला प्रणाम करून मी अटल सेतू मुंबईकरांसाठी देशातील लोकांसाठी समर्पित करत आहे."
विकसित भारतासाठी नारी शक्तीने पुढे येणं महत्त्वाचं : कोरोना महामारीमध्येही मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं काम सुरू होतं. ही फार मोठी उपलब्धी आहे. देशात विकास होणार ही मोदीची गॅरंटी आहे. आमच्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट भारत नवनिर्माणाचं माध्यम आहे. आज अनेक प्रोजेक्टचं उद्घाटन, लोकार्पण झालं आहे. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंपासून अजित पवार यांच्या टीमचं हे काम आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. इतक्या मोठ्या संख्येनं महिला येथे आल्या आहेत. त्यांनी आशीर्वाद दिले आहेत. त्यापेक्षा मोठं सौभाग्य काय असू शकतं असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. विकसित भारतासाठी नारी शक्तीने पुढे येणं तितकंच महत्त्वाचं आहे. जनधन बँक खातं, उज्वला योजना, पीएम आवास घर योजना, सुकन्या समृद्धी माध्यमातून जास्तीत जास्त व्याज हे सर्व आम्ही करत आहोत. असा दावाही त्यांनी यावेळी केला.
बांद्रा - वरळी सीलिंक पेक्षा पाच पटीने मोठा सेतू : अटल सेतुसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टील, इतर सामान त्यामध्ये चार हावडा ब्रिज व सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी निर्माण झाले असते. हा ब्रिज बांधण्यासाठी जपानने जो सहयोग दिला आहे. त्यासाठी मी जपान सरकारचा विशेष आभारी आहे. जेव्हा माझ्यावर 2014 च्या निवडणुकीची जबाबदारी दिली होती. तेव्हा मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन मी काही क्षण घालवले होते. मागच्या दहा वर्षांमध्ये भारत बदलला आहे. याची चर्चा खूप होते असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. दहा वर्षांपूर्वी हजारो, करोडोचे मेगा प्रोजेक्ट स्कॅमची चर्चा व्हायची. आज दहा वर्षात झालेल्या अनेक यशस्वी प्रोजेक्टची चर्चा होत आहे. आम्ही रेल्वेचा चेहरा बदलत आहोत. वंदे भारतला प्राधान्य दिलं आहे. मागच्या वर्षी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग उद्घाटन झालं. नवी मुंबई विमानतळाचं काम जोरात सुरू आहे. मुंबईला लवकरच नवीन बुलेट ट्रेन मिळणार आहे असंही ते यावेळी म्हणाले.
आमच्या सरकारची नियत साफ : महाराष्ट्राला इतर राज्याला जोडण्यासाठी अनेक प्रोजेक्ट करण्यात येत आहेत. अटल सेतू विकसित भारताची एक झलक आहे. पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेली कामं आमच्या सरकारने पूर्ण केली आहेत. अटल सेतूचं प्लॅनिंग सुद्धा कित्येक वर्षापासून सुरू होतं. बांद्रा वरळी सीलिंग प्रोजेक्ट, अटल सेतुपेक्षा पाच पटीने लहान असून, त्याला दहा वर्षे लागली व बजेट चार-पाच पटीने वाढले. पण अटल सेतू आम्ही जलद गतीने पूर्ण केला. आम्ही अटल पेन्शनही चालवत आहोत. अटल सेतू सुद्धा बनवत आहोत. आमच्या सरकारची नियत साफ आहे व निष्ठा फक्त देशाच्या प्रति व देशवासी यांच्या प्रति आहे असा मोदी यावेळी म्हणालेत.