महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचत गटांना केंद्र सरकार करणार ३०० कोटींची मदत? - yavatmal

मोदी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे येत असून तेथे महिला बचत गटांच्या एका मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या ३०० कोटींमुळे या महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

मदन येरावार

By

Published : Feb 13, 2019, 1:05 PM IST

Updated : Feb 13, 2019, 1:44 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचत गटांना ३०० कोटींची मदत जाहीर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून राज्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या चळवळीत सर्वोत्तम कामगिरी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याने मोदींच्या हस्ते या चळवळीशी संबंधित प्रमुख महिला बचत गट, त्यांना मदत करणाऱ्या बँका यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मोदी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे येत असून तेथे महिला बचत गटांच्या एका मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या ३०० कोटींमुळे या महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार महिला बचत गट असून विविध वस्तूंची उत्पादने करून त्यांची विक्री करण्यात ते आघाडीवर आहेत. याशिवाय त्यांना मोठ्या प्रमाणावर बँकांकडून अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. या महिला बचत गटांवर किमान २ लाख महिला आणि त्यांचे कुटुंबीय यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उदरनिर्वाह अवलंबून आहे.

'या' एका अधिकाऱ्यामुळे यशस्वी होतो आहे मोदींचा मेळावा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात भेट देऊन आपले सरकार शेतकऱ्यांसोबत आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे आहे. त्यामुळे ऐनवेळी पांढरकवडा येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य सरकारला हा कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्याची सूचना करण्यात आली, तेव्हा मंत्रालय आणि जिल्हा पातळीवर एकच हल्लकल्लोळ उडाला. या महिला बचत गटांचे जिल्ह्यातील प्रमुख असलेले जिल्हा परिषदेतील प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांचा सर्व महिला बचत गट आणि सदस्यांशी उत्तम संपर्क आहे.

कुलकर्णी यांच्यामुळे ही चळवळ जोमाने जिल्ह्यात फोफावली. मात्र, कुलकर्णी डोळ्याच्या गंभीर आजारामुळे डोळ्यावर शस्त्रक्रियेसाठी मुंबईत एका रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना सुट्टी मिळायला अवकाश असताना मोदींच्या कार्यक्रमासाठी त्यांना तातडीने बोलावून घेण्यात आले. आतापर्यंत ज्या महिला बचत गटांसाठी काम केले, त्यांची दखल स्वतः पंतप्रधान घेणार या आनंदानेच कुलकर्णी डोळ्याची तमा न बाळगता यवतमाळमध्ये गेले. तसेच प्रवास करण्यास मनाई असतानाही हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. किमान ३ लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील, असा त्यांचा अंदाज आहे. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

वणीतील कार्यक्रम रद्द?

सुरुवातीला मोदी हे यवतमाळ येथील वणी या तालुक्याच्या शहरात येऊन कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांचे भूमीपूजन करणार होते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे या रस्त्यांच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. त्यामुळे अखेर मोदींना वणीला जाणे रद्द करावे लागले, अशी चर्चा आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी ही चर्चा फेटाळून लावली. पांढरकवडा येथे काही दिवसांपूर्वीच कार्यक्रम ठरला होता, अशी सारवासारव त्यांनी केली.

Last Updated : Feb 13, 2019, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details