मुंबई -निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छिमार उद्ध्वस्त झाले आहेत आणि आता पुन्हा या कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौऱ्यात, कोकणाचे जे विदारक चित्र पाहिलं ते कुठेतरी आपल्याला बदलायचे आहे, कोकणवासियांना तत्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे सर्वांच्या माध्यमातून कोकणाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणू, असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे व्यक्त केला आहे.
चक्रीवादळामुळे झालेले कोकणाचे अतोनात नुकसान, शासनाने कोकणवासियांच्या तोंडाला पाने फुसण्याचा केलेला प्रकार, तसेच शासनाकडून असलेल्या कोकणवासीयांच्या अपेक्षा आणि सध्या कोकणवासीय जगत असलेले खडतर जीवन याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी फेसबुकला लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
मी कोकण मोहीम -
निसर्ग वादळामुळे कोकणाला मोठा फटका बसला असून बागा संपूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत. बागायतदारांना मदत करण्यासाठी मुंबईतील तरुणांच्या समूहाने आणि सेवाभावी समूहाने मदतीसाठी पुढे यावे. बागायतदारांना संकटात साथ द्यावी, असे आवाहन प्रविण दरेकर यांनी केले. दरम्यान 'मी कोकण' नावाचे अभियान सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानांतर्गत प्रकल्प तयार करणे, पर्यटनास चालना देणे, मार्केटिंग करणे, नवनवीन उद्योगांना महसूल उपलब्ध करून देणे, असे या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मी कोकण या अभिनयाच्या माध्यमातून कोकणात आमूलाग्र क्रांती घडेल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात महापूर आला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ आला, तसेच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला मदतीचे सर्व निकष बदलून तातडीने मदतीचा हात दिला होता. परंतु दुर्दैवाने या शासनाने तातडीने कोकणासाठी कोणतीही मदत दिलेली नाही. याचे शल्य मनात आहे. कोकणाला उभारी देण्यासाठी दीर्घकालीन काम करणे आवश्यक आहे. म्हणूनच मुंबई, ठाणे, पुण्यातील चाकरमान्यांनी आता कोकणाला मदत करण्यासाठी पुढे यावे. कोकणात फलोत्पादन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी दिशादर्शक प्रकल्प अहवाल तयार करून कोकणला उभारी देऊ, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.