मुंबई - राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी राजकीय पक्षांकडून नक्की कोणत्या 12 जणांना संधी मिळणार, यांची उत्सुकता कायम आहे. यात दररोज नवनवीन नावांची भर पडते आहे. याच जागेसाठी मराठी नाट्यकर्मीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रसाद कांबळी यांचा नावाची शिफारस केली आहे.
मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष प्रसाद कांबळी, दिगंबर प्रभू, शरद पोंक्षे, अविनाश आणि ऐश्वर्या नारकर, संतोष काणेकर हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून कोरोना काळात नाट्य परिषदेचे सदस्य असलेल्या रंगकर्मीं आणि पडद्यामागील कामगार यांना भरीव मदत करण्यात आली होती. पक्षाने केलेल्या मदतीमुळे रंगमंच कामगारांना प्रत्येकी 3 हजार रुपयांची मदत करणे नाट्य परिषदेला शक्य झाले होते. त्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रंगकर्मी दिगंबर प्रभू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे राज्यपाल नियुक्त विधान परिषद जागेवर, यावेळी प्रसाद कांबळी यांना संधी देण्यात यावी, अशी शिफारस केली. मराठी रंगभूमीच्या 115 वर्षांच्या दैदीप्यमान इतिहासात कधीही एखाद्या रंगकर्मीला हा बहुमान मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी तरी ही संधी देण्यात यावी, अशी रंगकर्मीच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले. तटकरे यांनी ही बाब पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घालू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, असे असले तरीही येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांच्याकडे देखील प्रसाद यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचे, दिगंबर प्रभू यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
कोण आहेत प्रसाद कांबळी?
'वस्त्रहरण' या मालवणी नाटकाद्वारे मराठी माणसाच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले दिवंगत अभिनेते मच्छिद्र कांबळी यांचे सुपुत्र असलेले नवनाथ ऊर्फ प्रसाद कांबळी हे व्यवसायाने नाट्यनिर्माते आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. एक नाट्यनिर्माता म्हणून 'भद्रकाली प्रोडक्शन' या आपल्या नाट्य संस्थेकडून त्यांनी अनेक उत्तम आणि नाविन्यपूर्ण नाटके मराठी रंगभूमीवर आणली आहेत. यात 'संगीत देवबाभळी', 'सोयरे सकळ', 'हा शेखर खोसला कोण आहे'..?, 'गेला उडत', 'गुमनाम है कोई' आशा काही नाटकांचा समावेश आहे. आजवरच्या या प्रवासात संस्कृती कलादर्पण, व्यावसायिक नाटकांना मिळणारे राज्य शासनाचे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्याच्या नाटकांना मिळालेले आहेत.
दिवंगत मच्छिद्र कांबळी यांनी कणकवली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा पुत्र प्रसाद यांनी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी एकदा अंगाला गुलाल लावून झालेला आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळवून पुन्हा गुलाल खेळण्याची संधी त्याला राष्ट्रवादी काँग्रेस देणार का, ते पहावे लागेल.