महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार प्रकल्प: शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावर लाथ मारली; प्रमोद जठारांची संतप्त प्रतिक्रिया

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर शिवसेनेकडून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मात्र, जठार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका उद्योगमंत्र्यानेच लाखो रोजगार संधी निर्माण करणारा उद्योग रद्द करावा, ही संपूर्ण कोकणवासीयांची शोकांतिकाच आहे. मात्र, रद्द झालेला एन्रॉन पुन्हा उभा राहू शकतो.

भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार

By

Published : Mar 3, 2019, 10:12 PM IST

मुंबई - नाणार प्रकल्प रद्द होणे, हा बेरोजगारांच्या आयुष्यातील काळा दिवस आहे. प्रकल्प रद्द झाल्याने लाखो तरुणांची रोजगाराची संधी गेली आहे. शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावरच लाथ मारली असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार यांनी केला आहे. सोमवारी कणकवलीत सभा घेऊन युतीच्या विरोधात निवडणूक लढवायची, की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचेही जठार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार

नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द केल्याचे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यावर जठार यांनी आज ही संतप्त प्रतिक्रिया दिली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर शिवसेनेकडून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मात्र, जठार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका उद्योगमंत्र्यानेच लाखो रोजगार संधी निर्माण करणारा उद्योग रद्द करावा, ही संपूर्ण कोकणवासीयांची शोकांतिकाच आहे. मात्र, रद्द झालेला एन्रॉन पुन्हा उभा राहू शकतो. त्याचधर्तीवर नाणार प्रकल्पही पुन्हा सुरू होईल. त्यासाठी केवळ सौदी अरेबियामधून एखादी रिबेका मार्क कंपनी मातोश्रीवर यायला हवी, असा टोलाही जठार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

कोकणात काबाड कष्ट करणाऱ्या गरिबांच्या घरातील चूल पेटावी, यासाठी भाजप सरकारने हा प्रकल्प आणला होता. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेला येथील गरिबांचे, बेरोजगारांचे सोयरसुतक नाही. नाणार रद्द झाल्याने कोकणातील ३ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प होत असताना पर्यावरणाची अधिक काळजी घेता आली असती. विनाकारण पर्यावरणवाद्यांनी कोकणच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने हा प्रकल्प रद्द होण्याचा घाट घातला, हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. कोकणच्या आर्थिक क्रांतीमध्ये ३ लाख कोटींचा खड्डा पडला असून आता तो भरून येणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details