मुंबई : Prakash Ambedkar On PM Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईतील वाय. बी सेंटर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवार यांनाही आमंत्रण दिलं होतं. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली. मात्र, 'इंडिया' आघाडीत सहभागी होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
फक्त कॉफी घेतली : कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉफी पिण्यासाठी बोलवलं होतं. त्या ठिकाणी शरद पवार देखील उपस्थित होते आणि आम्ही बाराजण त्या ठिकाणी होतो. 'इंडिया' आघाडी किंवा महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात काही चर्चा झाली नाही. त्यामुळं त्या संदर्भात बोलणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काहीतरी घडेल असं मला वाटत नाही. माझा भाजपाला कायम विरोध आहे. 'वंचित'ला काँग्रेस प्रवेश देणार नाही, अशा प्रकारची त्यांची जर धारणा असेल तर त्यांनी वाट बघत बसावी, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला लगावला आहे.
जरांगे पाटलांशी प्रामाणिक राहावं : मराठा आरक्षणा मुद्द्यावरून जरांगे पाटील यांना राज्यभर चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शासनानं जरांगे पाटलांशी इमानदारीनं बोलावं. आरक्षण आणि जातनिहाय जनगणना याचा कुठलाही संबंध नाही. बिहारच्या जातीनिहाय जनगणनेनुसार, असं समजतं की कुठलीही जात प्रबळ नाही. आरक्षणासंदर्भात शासनाने फसवू नये. मनोज जरांगे यांच्या निमित्तानं जे वादळ उभं राहिलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहावं. तरच ते नियंत्रित राहील नाहीतर ते शासनावर उलटेल, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिलाय.