मुंबई- मच्छीमारीची लिलाव पद्धत बंद करा आणि मच्छीमारांना थेट ठेका द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच सुतार, कुंभार या समाजातील लोकांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेतली. पक्षाचे उपाध्यक्ष अॅड. धनराज वंजारी हे देखील यावेळी उपस्थित होते. सध्या राज्यात लिलाव पद्धतीने मच्छीमारी ठेके दिले जात आहेत. मात्र, मच्छीमार समाज हा गरीब असल्यामुळे त्यांना लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. त्यामुळे ही लिलाव पद्धत बंद करुन ते सर्व ठेके मच्छीमारांना थेट देण्यात यावे, शिवाय मच्छिमारांच्या सहकारी संस्था आहेत, त्यांना मच्छीमारी करण्याचे अधिकार देण्यात यावे. शासनाने असे केले तर पंचवीस ते तीस लाख मच्छीमार बांधवांचा आर्थिक प्रश्न सुटेल. यामुळे त्यांना मदत करण्याची शासनाला गरज पडणार नाही. मच्छीमारी व्यवसायावर ते आपले पोट भरू शकतील व ते स्वतःच्या पायावर उभे राहतील.
सुतार, कुंभार यांचे आयुष्य कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना बँका मदत करायला तयार नाही. कुंभार, सुतार यांच्याकडे परवाने आहेत. त्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, त्यामुळे शासनावर फार-फार तर पंचवीस कोटी रुपयांचा बोजा पडेल. राज्यात सुमारे १७ लाख लोकसंख्या या समाजाची असून शासनाच्या अनुदानामुळे हा समाज पायावर उभा राहील, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.