मुंबई- एमआयएमने आमच्याकडे १०० जागांची मागणी केली नाही. तसा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. परंतु, आम्ही विधानसभा निवडणुकीत एमआयएमसोबत आघाडी करण्याचे निश्चित केले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले, लोकसभेच्या ४८ जागांपैकी मतमोजणीनंतर अनेक ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी मते मिळाल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन हॅकिंग नाहीत तसेच त्यात फेरफार करता येत नाही, असे स्पष्टपणे जाहीर केले होते. परंतु, असे का झाले याची माहिती न्यायालयाने आयोगाकडून घ्यावी. याविरोधात आम्ही ३१ याचिका दाखल केल्या आहेत.
जिथे जास्त मते मिळाली तिथे निकाल जाहीर करता येत नाही. त्याची माहिती आयोगला दिल्यानंतर अधिकारी त्यासंदर्भात माहिती देतो. त्यानंतर आयोग निर्णय घेतो. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे जास्त मते मिळाल्याच्या ठिकाणी जो निकाल जाहीर करण्यात आला तो बेकायदेशीर आहे. त्यामुळे या निवडणुका रद्द कराव्यात. लोकांचा अजूनही विश्वास आहे. त्यामुळे आता न्यायालयाने आमच्या याचिकांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल द्यावा. देशात यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही काँग्रेसला ४० जागांची ऑफर केली, त्यांनी ती स्वीकारावी. सद्या काँग्रेसकडे केवळ धड राहिले आहे. तसेच काँग्रेसकडे संघटन मजबूत राहिले नाही. त्यामुळे आता काँग्रेसने पुढे काय निर्णय घ्यायचा आहे तो ठरवावा, असेही त्यांनी यावेळी म्हटले.