मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आपला महापौर बसवण्याचा निर्धार केलेल्या भाजपने बीएमसीमध्ये नव्याने नियुक्ती केल्या आहेत. भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर पालिकेच्या नियमानुसार गटनेता आणि विरोधी पक्षनेता वेगळा असू शकत नाही. त्यामुळे शिंदे यांना विरोधी पक्षनेते पद मिळणार नसल्यामुळे मराठी भाषा दिनीच मराठी नगरसेवकाचा राजकीय बळी दिल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. महापौर निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करून सेनेचा महापौर निवडून आणण्यास मदत केली होती. त्यावेळी भाजपने आपण विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार नाही, आम्ही पहारेकरी म्हणून काम करू, भाजप कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. शिवसेना काही केल्या आपल्यासोबत येत नाही, हे स्पष्ट झाल्यावर भाजपने मुंबई महापालिकेतही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला.