महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकांना 'कोरोना'चा फटका, डिसेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरिल स्थगिती उठविण्याबाबत व निवडणूका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.

Maharashtra Gram Panchayat Election
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक

By

Published : Jun 4, 2020, 4:47 PM IST

मुंबई - देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना साथ रोगांचा अटकाव लवकर होणार नसल्याचे शासनाच्या आता लक्षात आल्याचे आता दिसत आहे. राज्यातील कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान होऊ घातलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ज्या ग्रामपंचायतींची ५ वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. कोरोनाची वाढती साथ लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणूक आयोगास नुकतीच केली होती. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबींकरिता मोठा वेळ लागतो. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच प्रस्तावित निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील ६ महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणूक आयोगास करण्यात आल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे की, निवडणूक आयोगाच्या १७ मार्च २०२० रोजीच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्या ग्रामपंचायतींची ५ वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरिल स्थगिती उठविण्याबाबत व निवडणूका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details