मुंबई- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा आणि त्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यावर सोमवारी (10 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निकच्या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश आणि त्याला कोणतीही आडकाठी येणार नसल्याने ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रत्येक वर्षी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी केली जाते. मात्र यावेळी पहिल्यांदाच पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया अगोदर सुरू केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे, सोबतच ई-स्क्रूटिनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.
तसेच, प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ई-स्क्रूटिनी पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी माहिती देखील सामंत यांनी दिली.
हेही वाचा-राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना घडामोडी एका क्लिकवर..