मुंबई -मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आरोग्य व्यवस्था देखील खराब अवस्थेत आहे. मात्र, या कठीण काळातही राजकीय पक्ष राजकारण सोडताना दिसत नाही. भांडुप येथील एका लसीकरण केंद्राचे महापौर किशोर पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, काही तासांपूर्वीच स्थानिक भाजप नगरसेविकेने या लसीकरण केंद्राचे उद्घाटन केल्यामुळे पुन्हा एकदा सेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत.
भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले रुग्णालय येथील लसीकरण केंद्राचे आज (दि. 29 एप्रिल) महापौर सकाळी 11 वाजता उद्घाटन करणार होत्या. मात्र, महापौर उद्घाटन करण्यापूर्वीच भाजपच्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी कार्यकर्त्यांसोबत जाऊन सकाळी आठ वाजता लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, महापौर या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करणार हे आम्हला माहीतच नव्हते, असे सांगत साक्षी दळवी यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.