मुंबई- भाजपचे ज्येष्ठ व माजी मंत्री एकनाथ खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या बेलार्ड पिअरच्या कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपला मोठा धक्का देणारा खडसे यांचा पक्षप्रवेश असल्याने त्यासाठी राष्ट्रवादीकडून मोठा गाजावाजा केला जाणार आहे.
राष्ट्रवादी भवन येथे दुपारी 2 वाजता प्रदेश कार्यालयाच्या मुख्य सभागृहात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा प्रवेश होईल. त्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक, माजी आमदार आदींचा प्रवेश होणार असून त्याला पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे हजर राहणार आहेत. तब्येत बरी नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या मोठ्या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला गैरहजर राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -'मुलगी म्हणून मी सदैव त्यांच्या सोबतच, त्यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम'
कोरोना संसर्गाची भीती असल्याने या सभागृहात आमदार, मंत्री आणि मोजके पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. अगदी दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधी आणि पत्रकार यांना तेथे प्रवेश असणार नाही. यामुळे हा पक्ष प्रवेशाचा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह असेल, त्याचे आउटपूट माध्यमांना उपलब्ध करून दिले जाईल. त्यानंतर पवार आणि खडसे एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत. प्रसिद्धी माध्यमाची उद्या मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रदेश कार्यालयाच्या बाहेर एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तिथून पवार आणि खडसे प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार आहेत. बॅलार्ड पियर परिसरातील सर्व रस्ते उद्या सकाळपासून बॅरिकेड लावून अडवण्यात येणार आहेत. गर्दी होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यालयाच्या गल्लीमध्ये प्रवेश असणार नाही.