मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्यानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनुराग कश्यप यांना समन्स बजावले असून 1 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पायल घोष प्रकरणी अनुराग कश्यप यांना पोलिसांचे समन्स
अनुराग कश्यप यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आल्यानंतर यासंदर्भात अधिक चौकशी करण्यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्याकडून अनुराग कश्यप यास 1 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांचा योग्य प्रतिसाद नसल्याचे सांगत पायलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.
कश्यप यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करूनअभिनेत्री पायल घोषने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता वर्सोवा पोलीस ठाण्याकडून त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
अनुराग कश्यप याने अनेकदा शारीरिक संबंध बनविण्यासाठी बळजबरी केल्याचे पायलने म्हटले आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊनही अनुराग कश्यप याची चौकशी होत नसल्याचे म्हणत तिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. याबरोबरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा पायल घोष हिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.