मुंबई - महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलिसांचे साहित्य संमेलन आज मुंबईत भरले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात १७० पोलीस साहित्यिक सहभागी झाले. या संम्मेलनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ऐरवी हातात शस्त्र, काठ्या घेवून समाजकंटक, आंदोलकांना पांगविणारे आणि नेत्यांच्या बंदोबस्तात दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या खाकी वर्दीवाल्यांकडून आता चक्क कविता, चारोळी, शौर्यगीत आणि साहित्यांवरील चर्चा, मतमतांतरे ऐकू येणार आहेत.या संम्मेलनात कॉन्स्टेबलपासून ते अप्पर महासंचालक दर्जापर्यंतचे अधिकारी आपले साहित्य, विचार मांडतील. पोलिसांची सामाजिक जाणीव समाजापर्यंत पोहोचावी आणि जनतेशी सुसंवाद साधावा, हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकारामुळे हा अभिनव उपक्रम साकारला जात आहे. कामाच्या व्यापामुळे नित्यपणे ताणतणावाला सामोरे जावे लागते. तरीही त्यांच्यातील साहित्याविषयीच्या जाणीवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत, या हेतूने पडलसगीकर यांनी त्याला तात्काळ मान्यता देत सर्व कार्यक्रमाची जबाबदारी शेखर यांच्यावर सोपविली आहे.