मुंबई -दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. मात्र, या आंदोलनकर्त्यांना गेट वे ऑफ इंडिया येथून आझाद मैदानात हालवण्यात आले. आझाद मैदानात आंदोलन करण्याचे नियोजनात नसल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आजचे आंदोलन जरी मागे घेतले असले तरी, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काम सुरूच राहील, असे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
सामान्य नागरिक आणि पर्यटकांना अडथळा होत असल्याचे कारण देत आंदोलकांना आझाद मैदानात नेण्याची कारवाई करण्यात आली. आम्ही आंदोलकांना वारंवार गेट वे ऑफ इंडिया येथे सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांना जबरदस्ती आझाद मैदान येथे हलवण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली.