मुंबई -गोराई भागातील हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्यव्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणींची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 13 हजार 500 रुपयांची रोख रक्कम व पाच मोबाईल, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोराई भागातील दोन हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायासावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी दोन अल्पवयीन मुली तर तीन सज्ञान मुली आढळल्या. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या 32 वर्षीय महिला दलालासह हॉटेलचा केअर टेकर व व्यवस्थापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाच मुलींची या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली.
या प्रकरणी भा.दं.वि.चे कलम 370 (3), 34 भा.दं.वि.चे सह कलम 4 व 5, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 सह कलम 12, 16, 17, 18, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा,2012 (पोक्सो), बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनयम 2015 चे कलम 75, 81 व 87 अन्वये गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त एस. विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भरत घोणे, सहायक पोलीस निरीक्षक पुनम यादव, अंमलदार चंद्रसेन गायकवाड, गिरीष सुर्वे, अजय कदम, विक्रांत खांडेकर, सोनाली लाडे व चालक उपेंद्र मोरे या पथकाने पार पाडली.
हेही वाचा -दिवाळी विशेष : बाजारात आले आहेत 'चॉकलेटचे फटाके'