मुंबई -विधी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्याचे सर्व पेपर मराठीतून देण्यात, यावेत या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (८ जुलै) मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बेमुदत उपोषणाला सुरूवात केली होती. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये पोलिसांच्या नोटीसवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विद्यापीठाने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यापूर्वीच संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे आणि त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी नोटीस बजावली. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबईतील अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशिल ठिकाण आहे. त्यामुळे या परिसरात गंभीर दखलपात्र गुन्हा घडल्यास सार्वजनिक मालमत्तेला धोका ठरू शकतो. त्यामुळे या परिसरात जमावबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठीच्या आग्रहासाठी उपोषण सुरू करणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना आपले उपोषण या नोटीसमुळे मागे घ्यावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.