मुंबई - बहुचर्चित पी एम सी बँक आणि येस बँक घोटाळा प्रकरणातील आरोप असलेला राकेश कुमार वाधवान व त्याचा मुलगा सारंग वाधवान आणि राणा कपूर तसेच इतर आरोपींपैकी मेहुल दीपक ठाकूर यांच्यावर प्रचंड मोठ्या रकमेचे आर्थिक बेकायदेशीर गैरव्यवहार केल्याप्रकरणी खटले दाखल आहेत. यापैकी राणा कपूर अटकेत आहे. मात्र मेहुल ठाकूर जामीनावर बाहेर आहे. मेहुल ठाकूर याचा विदेशात जाण्यासाठीचा अनुमती अर्ज सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला. तसेच सुनावणी देखील झाली. मात्र न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून सुनावणी तहकूब केली . तसेच 31 मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
पीएमसी बँक घोटाळा -सक्तवसुली संचलनालयाने येस बँकेचा संस्थापक राणा कपूर तसेच पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी राकेश कुमार वाधवान व त्याचा मुलगा सारंग वाधवान आणि इतर 13 आरोपींवर कारवाई केलेली आहे. काही आरोपी जामिनावर आहेत. त्यांच्या संदर्भात सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. या आरोपींपैकी एक आरोपी मेहुल ठाकूर याचा सत्र न्यायालयामध्ये विदेशात जाण्यासाठी अनुमती अर्ज नुकताच दाखल करण्यात आला. मात्र न्यायालयाने ताबडतोब निर्णय घेतला नाही.
विदेशात जाण्यासाठी परवानगी -मेहुल ठाकूर हा एक आरोपी आहे. परंतु त्याला कामानिमित्ताने विदेशात जाण्यासाठी परवानगी हवी आहे. म्हणूनच त्याच्या वतीने वकील विवेक बाबर यांनी मेहुल ठाकूर याला विदेशात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज दाखल केला. तर या संदर्भात सक्तवसुली संचालनाच्या वतीने वकील सुनील गोंजालवीस यांनी न्यायालयासमोर ईडीची बाजू मांडली.