मुंबईAtal Setu inauguration : अटल सेतू प्रकल्पाचे ( उद्धाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज करण्यात आले. या अटल सेतुच्या कामाची सुरूवात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना झाली होती. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांसाठी हा प्रकल्प महत्वकांक्षी मानला जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 18 हजार कोटी रूपयांचा खर्च आला आहे. या प्रकल्पमुळे मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटात कापता येणार आहे.
उपनगरांनाही मुंबई जोडला : अटल सेतू म्हणजे, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लाईनमुळे दक्षिण मध्य मुंबईत वरळी आणि शिवडी खाडीवर जोडले गेले. हीच दक्षिण मुंबई अरबी समुद्र पार करत आता नवी मुंबईत चिर्ले गावाशी आपले बंधार्याचे नाते सांगू लागेल. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई प्रवासाला जिथे आज किमान 3 तास लागतात तिथे हे अंतर अटल सेतूवरून म्हणजे वरळी किंवा शिवडी ते चिर्ले फक्त अर्ध्या तासात पार करता येणार आहे. या सेतूने नवी मुंबईच्या नावात खर्या अर्थाने मुंबई आणली आहे. याचा अर्थ नवी मुंबईचा प्रचंड मोठा परिसर नरीमन पॉईंट किंवा लोअर परळच्या अगदी निकट नेऊन ठेवला आहे. या सेतूचे एक टोक आजच्या वरळी-वांद्रे सी-लिंकच्या जवळ टेकले असल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरांनाही हा सेतू नवी मुंबईशी थेट जोडतो आहे.
कॅमेऱ्याची नजर असणार : अटल सेतूवर हा अत्याधुनिक पुल आहे. यावर वाहतूक नियंत्रणासाठी विशिष्ट यंत्रणा बसवण्यात आलीय. अटल सेतुवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलीय. या यंत्रणे अंतर्गत अटल सेतूवर विविध प्रकारचे तब्बल 400 कॅमेरे बसवण्यात आलेत. यामुळे सेतुवर नियमांचे उल्लंघन करणारं वाहन अत्याधुनिक कॅमेऱ्यात सेकंदात कैद होणार आहेत. अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
ताशी 100 किमी वेग : अटल सेतू महामार्गाची रचना ताशी 100 किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आलीय. यापूर्वी महामार्गावरून ताशी 80 किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. मात्र, आता सेतू वाहतुकीसाठी खुला होत असताना एमएमआरडीएने ताशी 100 किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणेअंतर्गत सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. यात 130 हाय डेफिनिशन पीटीझेड कॅमेरे, 190 आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे यांचा समावेश आहे. इतक्या अत्याधुनिक सुविधांमुळे अटल सेतूवरील प्रवास सुरक्षित होणार असल्याचंही एमएमआरडीएचं म्हणणं आहे.