महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अद्यावत प्रयोगशाळा, संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती - मुख्यमंत्री ठाकरे बातमी

भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) ने देशातील तीन ठिकाणी उच्च क्षमतेच्या अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथील राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान (एनआयआरआरएच) तसेच कोलकाता आणि नोएडा, अशी ही तीन ठिकाणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन झाले

uddhav thackeray
uddhav thackeray

By

Published : Jul 27, 2020, 8:37 PM IST

मुंबई - कोरोनाच्या भयंकर साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले. महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकारशक्तीचे महत्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्यावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचविणे हा आपला संकल्प असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच तातडीची पाऊले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखल्याचे आणि 10 लाख लोक बरे झाल्याचे सांगितले.

भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) ने देशातील तीन ठिकाणी उच्च क्षमतेच्या अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथील राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान (एनआयआरआरएच) तसेच कोलकाता आणि नोएडा, अशी ही तीन ठिकाणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन झाले याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

कोरोना लढ्यात ही आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याबद्धल पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, आज केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध आज तरी नाही, त्यामुळे सगळे विश्वच एक प्रयोगशाळा बनला आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर 20 दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. चेस दि व्हायरस परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत. कोरोनावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे राज्याने देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरु केला. या थेरपीचा उपचारांमध्ये परिणामकारक उपयोग दिसू लागला आहे.

मुंबईच्या परिसरात कायमस्वरूपी असे संसर्गजन्य रोगांवरील उपचार करणारे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले कि त्यामुळे येणाऱ्या अनेक जिवाणू आणि विषाणूजन्य रोगांचं ठामपणे मुकाबला करता येईल.

पीपीई किट्स, मास्क अधिक काळासाठी मिळाव्यात

केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पुढे देखील राज्यांना पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कचा पूर्वाधा करावा अशी विनंती करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्सचे टास्क फोर्स आणि जावोगावी ग्राम दक्षता समित्या स्थापन करून कोरोना विषयक जनजागृती करीत आहोत असे सांगितले. मार्च मध्ये राज्यात २ प्रयोगशाळा होत्या. त्या आता १३० पर्यंत गेल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतर उपाय योजनांची देखील माहिती यावेळी दिली.

चाचणी केंद्राविषयी माहिती

भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) ने देशातील तीन ठिकाणी ही अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान (एनआयआरआरएच) तसेच कोलकाता आणि नोएडा, अशी ही तीन ठिकाणे आहेत.

या उच्च क्षमता केंद्रांमध्ये सुविधा असून या यंत्राचे वैशिष्ट्य हे आहे की, कोविड विषाणूच्या बाराशे चाचण्या प्रत्येक दिवशी 3 पाळ्यांमध्ये आणि ते सुद्धा परिणामकारकरीत्या केल्या जातात. यात स्वयंचलित नमुना तपासणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. ग्रुप टेस्टिंग शक्य होते.

ही संपूर्ण प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने होत असल्याने चाचणीचा वेग तर वाढतोच शिवाय प्रत्यक्ष हाताळणी न झाल्याने या केंद्रातील व्यक्ती सुरक्षित राहतात. एकदा नमुने या यंत्रात टाकले की कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय प्रक्रिया सुरु होते आणि अव्याहतपणे सुरु राहते. रिमोट एक्सेस पद्धतीने चाचणीचे अहवाल आणि विश्लेषण प्राप्त होते. यात प्रक्रियेवर रिअल टाईम देखरेख ठेवता येते.

सध्या राज्यातील प्रयोगशाळामध्ये कोविड चाचणीसाठी बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. मॅन्युअल पद्धतीने आरएनए काढावा लागतो. त्यानंतर या नमुन्याची आरटीपीसीआर चाचणी दुसऱ्या यंत्रावर घेतली जाते. या नव्या प्रणालीत इतर रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्याबाबतीत देखील नमुन्यांची चाचणी करता येते. जसे की, एचआयव्ही, एचसीव्ही, सीएमव्ही सद्य परिस्थितीत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधानमध्ये आरटीपीसीआरवर आधारित प्रयोगशाळेत 200 चाचण्या दिवसाला होऊ शकतात.

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानविषयी

मुंबईतील या संस्थेने नुकतेच 50 वर्षे पूर्ण केली असून देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालण्याचा मान या संस्थेकडे आहे. प्रजननाच्या बाबतीत मुलभूत संशोधन याठिकाणी पार पाडले जाते. कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता या संस्थेने पुढाकार घेऊन कोविडची अद्ययावत प्रयोगशाळा सुरु केली आहे.

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे मॉडेल रुरल हेल्थ युनिट स्थापन केले असून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यात येते. पालघर जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने या संस्थेने डहाणू येथे देखील एक चाचणी सुविधा सुरु केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविल्या

राज्यात 2 हजार 665 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय.

एकूण 3 लाख 6 हजार 180 आयसोलेशन खाट

ऑक्सिजन खाट 42 हजार 813

आयसीयू खाट 11 हजार 882

3 हजार 744 व्हेंटीलेटर्स, 7 लाख 6 हजार 911 पीपीई किट्स

12 लाख 59 हजार 382 एन 95 मास्क

ABOUT THE AUTHOR

...view details