मुंबई -कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला इतर आजार असल्यास त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा असे रुग्ण अत्यावस्थ स्थितीत जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. मात्र, आता अशा रुग्णांना वाचवणे शक्य होणार आहे. तीव्र लक्षणे असणाऱ्या अत्यावस्थ रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरेपी केली जाणार आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी उपचार पद्धतीला यश आले असून आतापर्यंत तीन गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगरपालिका रुग्णालयांचे प्रमुख संचालक डॉ. रमेश भारमल यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. २४ ऑगस्टपर्यंत एकूण १ लाख ११ हजार ८४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या १८ हजार २६३ सक्रिय रुग्ण राहिले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)च्या गाईडलाईननुसार प्लाझ्मा थेरेपीदेखील सुरू करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय प्लाझ्मा थेरेपी सेंटर बनवण्यात आले आहे. या प्लाझ्मा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ रुग्णांवर केलेल्या उपचारांनंतर संबंधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली. या प्लाझ्मा थेरेपीला येणारे यश पाहता मोठ्या प्रमाणात ही उपचार पद्धती वापरली जाणार असल्याचेही ते म्हणाले.