मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रवाशांना सक्तीने घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी हे प्रवासी इतर ठिकाणी फिरताना आढळत आहे. अशाच एका प्रवाशाला धारावी पोलिसांनी पकडून सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला धारावीत फिरताना पोलिसांनी पकडलं
कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. ज्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाली त्यांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात आहे. तर, ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही अशा सर्व प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसने जगभरात हजारो लोकांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात या व्हायरसचे 52 रुग्ण असून, मुंबई आणि परिसरात 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा 17 मार्चला मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. ज्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाली त्यांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात आहे. तर, ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही अशा सर्व प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रवाशांना एका रूममध्ये राहून आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसतात का यावर देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात येतो.
होम क्वारंटाईन केलेल्या प्रवाशांना घरात राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी असे प्रवासी मुंबई बाहेर जाताना पकडण्यात आले आहेत. आजही धारावी येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. धारावी येथील हा रहिवाशी असून, तो नोकरी शोधण्यासाठी 28 जानेवारीला दुबईला गेला होता. 18 मार्चला तो अमिरेट्स एअरलाईन्सच्या विमानाने मुंबईत परत आला होता. त्याला होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही तो धारावीत फिरत होता. त्याच्या हातावर स्टॅम्प असल्याने धारावी पोलिसांनी त्याला पकडून अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.