मुंबई Patil in Maharashtra : सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणामुळं राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापलंय. राजकीय नेते खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर आरोप करत आहेत, मोठी चिखलफेक होत आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यात राज्यातील विकासकामांचं श्रेय घेण्यात स्पर्धा सुरु आहे. मात्र या सर्व गदारोळात राज्यात तीन पाटलांचाच माध्यमात आणि लोकांमध्ये बोलबाला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हे पाटील कोण आहेत ते आपण जाणून घेऊ या.
सध्या महाराष्ट्रात पाटलांचाच बोलबाला, नेमके कोण आहेत 'हे' पाटील?
Patil in Maharashtra : महाराष्ट्रात सध्या अनेक कारणांमुळं राजकीय तसंच सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. अशातच सध्या राज्यात माध्यमांमध्ये तीन पाटील रोजच चर्चेत असतात.
Published : Dec 23, 2023, 9:46 AM IST
|Updated : Dec 23, 2023, 12:43 PM IST
गौतमी पाटील : राज्यात मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव कोणाला माहीत नाही, असा शोधूनही सापडणार नाही. अगदी गाव-खेड्यात, चावडी, कट्यावर, रेल्वे प्रवासात गौतमीची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतंच नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रवास हा गौतमी पाटील ते मनोज जरांगे-पाटील व्हाया ललित पाटील असा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सरकारवर केली. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा डान्स होतोय. यासाठी होणारी गर्दी, मग होणारी मारामारी हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल देखील अनिल परबांनी सरकारला विचारला. गौतमीचा डान्स म्हटला की, लोक शाळेच्या छातावर, घरावर जाऊन डान्स पाहतात. राज्यात सध्या गौतमी पाटील ट्रेंडिंगवर आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी लोक एकमेकांवर पडताहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला सध्या जोरदार मागणी आहे, त्यामुळं सध्या महाराष्ट्रात तीन पाटील जोरदार चर्चेत आहेत, त्यापैकी पहिलं नाव म्हणजे गौतमी पाटील.
मनोज जरांगे पाटील : दुसरीकडं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाला जागं केलं असून रान उठवलंय. मनोज जरांगे पाटील हे सध्या संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. त्यांनी उपोषणदेखील केलंय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या किंवा मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. त्यामुळं मनोज जरांगे-पाटील यांची माध्यमात बातमी नाही, असा एकही दिवस जात नाही. अगदी मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण भाषणही माध्यमांमध्ये दाखवलं जाते. यावरुनच त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज येऊ शकतो. मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाले आहेत.
ललित पाटील : महाराष्ट्रात चर्चेत असणारा तिसरा पाटील मात्र त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे चर्चेत आहे. हा पाटील म्हणजे ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील. ड्रग्स प्रकरणामुळं पुण्यातील ललित पाटील चांगलाच चर्चेत आलाय. ललित पाटील हा 3 वर्षांपासून येरवडा कारागृहात होता. पण 3 वर्षांपैकी 9 महिने तो ससून रुग्णालयात दाखल होता. 2 ऑक्टोबर 2023 रोजी तो फरार झाला. ललित पाटीलमुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. ललित पाटीलमुळं राज्यातील ड्रग्सचं जाळे किती मोठं आहे हे पुढं आलं. आता ड्रग्सचे साठेही सापडत आहेत. ललित पाटीलनं मागील कित्येक दिवसांपासून माध्यमांत जागा घेतलीय. एकंदरीतच सध्या सरासरी विचार केला तर महाराष्ट्रात माध्यमात आणि लोकांमध्ये पाटलांचाच बोलबाला आहे. सध्या 'पाटील जोमात आणि सरकार कोमात' असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
हेही वाचा :