मुंबई: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघर या ठिकाणी झाला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भर उन्हात लाखो लोक तिथे जमले होते. गर्दीचे पूर्व नियोजन नसल्याने चेंगचेंगरी झाली. लोकांना आरोग्य, पाणीबाबत कुठल्याही सोयी सुविधा नियोजित केल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडल्या घटना घडली. यासंदर्भात आप पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी पनवेल न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आज याचिका दाखल करून पुढील सुनावणी 26 मे रोजी निश्चित केली.
पनवेल न्यायालयात खटला दाखल:पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित होते. याशिवाय अनेक मंत्री आणि इतर आमदार मान्यवर मंडळी उपस्थित होते. ज्यावेळी लाखोलोक पाण्यासाठी कासावीस झाले, आपला जीव वाचावा म्हणून जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते. त्यावेळी सर्व मंत्री आरामात जेवणाचा आस्वाद घेत होते. याला जबाबदार शासन आहे, असा आरोप करीत आप पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी पनवेल न्यायालयात फौजदारी संहिता नियम अंतर्गत खटला दाखल केला. आज न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली.