मुंबई - पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून अनेकदा मिळाले आहेत. त्यांनी केलेली सूचक वक्तव्ये ही गोष्ट अनेकदा अधोरेखित करुन गेली आहेत. आता त्यांचे नुकतेच केलेले एक वक्तव्य गाजत आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या आहेत की, 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच'. आता हे वक्तव्य मोठ्या चर्चेचा विषय झाले आहे.
भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नाही :पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नाही हेच दिसून येत आहे. त्याचवेळी पंकजा मुंडे यांची एकप्रकारे नाराजी मांडलेली दिसत आहे. आपली खंत व्यक्त करतानाच गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी काम केले. त्याची फळे आता सत्तेच्या निमित्ताने चाखायला मिळत आहेत, ही बाबही त्यांनी बोलून दाखवली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यांवर प्रतिक्रिया आणि पडसादही उमटत आहेत.
मुंडे यांना थेट पक्षात येण्याचीच ऑफर :राष्ट्रवादी काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना थेट पक्षात येण्याचीच ऑफर दिली आहे. पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी, पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचे असेल तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी उघडपणे अनेकदा बोलून दाखवली आहे. एकदा तर त्या म्हणाल्या होत्या की, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानंतर काय झाले हा सगळा इतिहास आहे.