मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता परिवर्तनाची नांदी झाली. त्यातच भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे काही नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाला पक्षातील अंतर्गत कारवाया कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. त्यातच माजी आमदार प्रकाश मेहता देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पंकजा यांच्यासोबत खडसे आणि मेहता देखील गोपीनाथा गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे. त्यातच माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील पंकजांची भेट घेतली आहे.
भाजपमधील काही नेते बंड पुकारणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका देखील झाली आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन 'पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,' असा खुलासा करावा लागला.