मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान एकूण १ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात ७० हजार २३३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जन सोहळा शांततेत पार पडल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशोत्सव समन्वय समिती, विविध यंत्रणा यांच्यासह मुंबईकर जनतेचे महापौर किशोरी पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी विशेष आभार मानले आहेत.
मुंबईनगरीत दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या गणरायाला मुंबईकरांनी काल १ सप्टेंबरला भावपूर्ण वातावरणात शांततेत तसेच सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन निरोप दिला. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने कोविडबाबतची आवश्यक ती सर्व खबरदारी घेत निरनिराळ्या उपाययोजना केल्या होत्या.
सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित दूरीकरण राखणे, गणपती मूर्तींची उंची मर्यादीत राखणे, मिरवणुका टाळणे, महानगरपालिकेने ठिकठिकाणी व्यवस्था केलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती सोपविणे, सर्व विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या कृत्रिम तलावांमध्ये तसेच शक्यतो घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे अशा निरनिराळ्या सूचनाही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. या सर्व आवाहनांना नागरिकांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद दिला. यातून मुंबईकरांची एकजूट आणि सहकार्याची भावना पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवली. त्याचे अनुकरण इतरांनी करावे असे महापौर व आयुक्तांनी म्हटले आहे.
विविध यंत्रणांचे आभार -
मुंबईकर जनतेसमवेत महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणारे पोलीस दल, वाहतूक पोलीस, नौदल, इतर शासकीय व निम-शासकीय यंत्रणा, तटरक्षक दल, हॅम रेडिओ, सर्व प्रसारमाध्यमे, खासगी तसेच सेवाभावी संस्था यांचेही महापौर व महापालिका आयुक्तांनी आभार मानले आहेत.