मुंबई - सोमवर आणि मंगळवारच्या मध्यरात्री मुसळधार पावसाने मालाड पिंपरी पाडा येथील संरक्षक भिंत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला जबाबदार असलेलेल्या संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व आपदग्रस्तांना तातडीने घरे द्या असे निर्देश शुक्रवारी स्थायी समितीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
मालाड दुर्घटना; कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - स्थायी समिती अध्यक्ष मुसळधार पावसात मालाड येथील संरक्षक भिंत कोसळून २७ जणांचा जीव गेला. या घटनेला चार दिवस उलटल्यानंतरही संबंधित कंत्राटदारावर कारवाई झालेली नाही. शिवाय आपदग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. यावर शुक्रवारी स्थायी समितीत पडसाद उमटले. हिमालय पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाने २४ तासाच्या आत संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली होती. मात्र, मालाड दुर्घटनेत २७ जणांचा जीव गेला तर शंभरहुन अधिक लोक जखमी झाले असताना याला जबाबदार असणाऱया कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या घटनेत येथील कुटुंबे बेघर झाली आहेत. त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करून कंत्राटदारावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली.
भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यानेच अवघ्या दीड वर्षात भिंत पडली. येथे पाण्याचा निचरा करणारे होल बंद झाल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. ३०० मिमी पाऊस पडल्याने पाण्याचा दाब येऊन भिंत कोसळली. भिंत सिमेंट क्राँकिटची बांधण्यात आली होती. मात्र, त्याचे बांधकाम मजबूत करण्यात आले होते. भिंतीचा पाया मजबूत नव्हता, त्यामुळेच भिंत कोसळली. याला संबंधित कंत्राटदार व अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केला. या भिंतीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व कुटुंबांना पाच लाख रुपयाची मदत जाहिर करण्यात आली. मात्र, ही मदत देण्यास विलंब का केला जातो आहे, असा सवालही नगरसेवकांनी विचारला. आपदग्रस्तांना मदतीची घोषणा केली जाते. मात्र, त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वीच्या घटनांमध्येही घोषणा होऊनही मदत मिळालेली नाही. मालाड दुर्घटनेतील आपदग्रस्तांना त्वरीत मदत मिळावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. दीड वर्षात भिंत कोसळतेच कशी? कंत्राटदारासह प्रशासनही त्याला जबाबदार आहे, असा आरोपही नगरसेवकांनी केला.
भिंत बांधण्यासाठी सल्लागारांनी काय सल्ला दिला. या दिवशी ३०० मिमी पाऊस पडला असून येथे पाण्याचा निचरा करणारे होल बंद झाले होते. त्यामुळे पाण्याचा दाब येऊन भिंत कोसळली असे प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे. मात्र, निचरा होत नसेल, तर ते यापूर्वीच काढण्यात का आले नाही. सल्लागारांनी बांधकामाबाबतचा काय सल्ला दिला होता. असा सवाल भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत व सपाचे रईस शेख यांनी विचारला. या दुर्घटनेनंतर जी कुटुंबे बेघर झाली आहेत, त्यांना पालिकेच्या संक्रमण शिबिरात तात्पुरत्या स्वरुपात राहायला का दिले जात नाही? असा प्रश्न नगरसेविका राखी जाधव यांनी उपस्थित केला. भिंतीचे बांधकाम करणाऱया कंत्राटदारावर तात्काळ कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली.
कंत्राटदारांने भिंतीचे बांधकाम करताना त्याचा पाया खोल करणे आवश्यक होते. बांधकाम करताना सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात आलेला नाही. संबंधित कंत्राटदारावर त्वरीत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या दुर्घटनेतील बेघरांना घरे देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.