विरोधक उद्धव ठाकरेंच्या का घेत आहेत भेटी? मुंबई: शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी भेट दिली. केजरीवाल आणि मान यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर भेट दिली आहे. तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय राजकारणात तिसरी आघाडी तयार होत असताना या नेत्यांनी मुंबईत येऊन मातोश्रीवर भेट देणे ही मोठी बाब आहे.
वास्तविक राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची राज्यातील ताकद कमी झाली आहे. असे एकीकडे भासविले जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा त्यांच्याकडे वाढलेला ओघ म्हणजे राष्ट्रीय राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचे महत्त्व वाढल्याचे अधोरेखित करीत आहे.
मातोश्रीचे अजूनही महत्त्व - ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजकारणामध्ये मातोश्रीला नेहमीच महत्त्व राहिले आहे. केंद्रातील नेते जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा ते मातोश्रीवर हजेरी लावत असत. मात्र त्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा आणि त्यांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व होते. तीच परंपरा आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवल्याचे दिसत आहे. अजूनही मातोश्रीचे महत्व कमी झालेले नाही.
उद्धव ठाकरे यांना वगळणे शक्य नाही-भले त्यांचे आमदार आणि खासदार जरी त्यांना सोडून गेले असले तरी मातोश्रीचे वजन कायम असल्याचेच यातून दिसते, असे जोशी म्हणाले. राष्ट्रीय राजकारणामध्ये तिसरी आघाडी तयार करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, त्यामध्ये निश्चितच उद्धव ठाकरे यांना वगळून कुणीही पुढे जाऊ शकत नाही असेही जोशी म्हणाले. कारण राज्याच्या राजकारणामध्ये भाजप पाठोपाठ जास्त खासदारांची संख्या असलेला पक्ष हा शिवसेनाच आहे.
प्रादेशिक पक्षांना महत्त्व - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितले की देशाच्या राजकारणामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाला हरवायचे असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न केला तरच शक्य आहे. मग त्यासाठी पंतप्रधान पदाचा चेहरा कोणीही असलं तरी भाजपला हरवणे हे एकमेव उद्दिष्ट सध्या विरोधकांनी ठेवल्याचे दिसते आहे. त्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद जर पणाला लावली तर ते शक्य आहे.
जनमानसातील प्रतिमा कायम-महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद निश्चितच जास्त आहे. त्यांचे काही आमदार खासदार त्यांना सोडून गेले असले तरी जनमानसामध्ये त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागलेला नाही. हीच बाब राष्ट्रीय नेत्यांच्या नजरेत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना डावलणे शक्यच नाही. म्हणूनच राष्ट्रीय नेत्यांची मातोश्रीवर भेटीसाठी असल्याचे दिसत आहे असेही ते म्हणाले.
बिगर हिंदुत्ववादी नेत्यांना पाचारण - शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्रीवर हिंदुत्व हा विचार मानणाऱ्या नेत्यांना प्रवेश असायचा. मात्र आता जे लोक हिंदुत्व हा विचार मानत नाहीत अशा बिगर हिंदुत्ववादी नेत्यांना मातोश्रीवर बोलावले जात आहे, ही दुटप्पी भूमिका आहे. हिंदुत्व हा विचार काय आहे हे बाळासाहेबांना माहीत होते. हिंदुत्व म्हणजे काय हे ज्यांना कळले नाही. त्यांच्याकडे अशाच नेत्यांची गर्दी होणार यात आश्चर्य वाटण्यासारखे काय नाही. मात्र हिंदुत्व मानणाऱ्या शिवसैनिकांचे दुर्दैव आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
हेही वाचा-
- Maharashtra Politics : आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी, ठाकरे-केजरीवाल बदलणार राजकीय समीकरण?
- New Parliament inauguration : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनातील फोटो हुकूमशाहीचे प्रतिम मानले जाईल-ठाकरे गट
- Arvind Kejariwal To Meet Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज घेणार शरद पवारांची भेट