मुंबई- विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघ 30 जून रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भगवी जर्सी घालून सामना खेळणार आहे. या भगव्या रंगामुळे राजकीय वातावरण तापले असून अल्पसंख्याक आमदारांनी या जर्सीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर सत्ताधारी आमदारांनी राष्ट्रीय ध्वजातल्या भगव्या रंगावर नाराजी कसली? हा प्रश्न उपस्थित केला. एकूणच भगव्या रंगाच्या जर्सीमुळे राजकीय सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत भगव्या रंगाचा करायचा आहे, त्याचाच हा एक भाग असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटले आहे. भगवा रंग आपल्या झेंड्यात असला तरी त्यात हिरवा रंगही आहे, याची आठवण आझमी यांनी करून दिली आहे. मोदी यांच्या नेतृत्वात हा रंग बदल केला जातोय, या प्रकारामुळे खेळात राजकारण आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केला.