महाराष्ट्र

maharashtra

'अग्निसुरक्षा, आरोग्य प्रमाणपत्र नसताना मुंबईतील हॉटेल्स सुरू कशी'

By

Published : Dec 20, 2019, 2:42 AM IST

मुंबईतील अनेक हॉटेलमध्ये अग्निसुरक्षा व आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसतानाही सुरू आहेत. महानगरपालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. यावर दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

विरोधी पक्षनेते रवी राजा
विरोधी पक्षनेते रवी राजा

मुंबई- दोन वर्षांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कमला मिल परिसरातील दोन पबला आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतून पालिका आजही काही शिकलेली नाही. मुंबईत आजही अनेक हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा व आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसताना सुरु आहेत. अशा हॉटेल्सची पालिकेने तपासणी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. मुंबईकरांच्या जीवाशी पालिका प्रशासन खेळत असल्याचा आरोप यावेळी रवी राजा यांनी आरोप केला. यावर त्याची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.


मुंबईत गेल्या काही महिन्यात घडलेल्या आग आणि इतर दुर्घटनांचा अहवाल स्थायी समिती सभागृहात सादर करण्यात आला. त्यावर बोलताना पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसल्याचे सांगत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईतील अनेक हॉटेल्स अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसतानाही सुरु आहेत. पालिकेचा कायदा धाब्यावर बसवला जात आहे. अशा रेस्टारंट व हॉटेल्सची संख्या मोठी आहे. दुर्घटना झाल्यावरच पालिका प्रशासन जागे होणार आहे का असा प्रश्न राजा यांनी उपस्थित केला. पालिकेने अशा हॉटेलवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली. गेट वे ऑफ इंडिया येथील प्रसिद्ध हॉटेलकडेही अग्नी आणि आरोग्य सुरक्षा प्रमाणपत्र नाही, असा आरोप त्यांनी केला. अशी हॉटेल्स कशाच्या जोरावर सुरु आहेत. पालिकेचे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा - 'भारतीय लोकशाहीचा योग्य सन्मान राखायचा असेल तर हा कायदा जायलाच हवा'

दरम्यान, कमला मिल दुर्घटनेतील एक हॉटेल पुन्हा सुरु झाले असून त्याला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वपक्षीयांनी या मुद्द्याला पाठींबा देत चौकशीची मागणी केली. यावर मुंबईत पालिकेचे अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसतानाही अशी हॉटेल्स सुरु असतील तर अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने अशा हॉटेल्सची पाहणी करून कारवाई करावी आणि त्याचा लेखी अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे.

हेही वाचा - मुंबई महापालिकेची थकीत करवसुलीसाठी बिल्डरांवर मेहरबानी, बांधकाम करात सवलत

ABOUT THE AUTHOR

...view details