मुंबई - कोरोनाच्या या महासंकटाविरूद्ध अनेक जण आपापल्या स्तरावर लढत आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कोव्हिड संकटाविरूद्ध लढणाऱ्यांना धन्यवाद देणारी एखादी ओळही आपल्या पत्रकार परिषदेत उच्चारली नाही. अशा प्रकारचे देवेंद्र फडणवीस हे भारतातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत. तसेच तो एक नवीन विक्रमच ठरेल, अशी टीका शिवसेनेच्या नेते मनिषा कायंदे यांनी केली आहे.
मानवी स्वभावामध्ये दुसऱ्या व्यक्तीवर टीका करण्याची वृत्ती ही जन्मजात असते. ही वृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. मात्र, कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये जिथे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, समाजसेवी संस्था, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करीत असलेले कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचविणारे एसटी बेस्ट आणि रेल्वे स्टाफ, त्यांना जेवण पुरविणारे नागरिक, जीवनावश्यक वस्तू पुरविणारे कामगार, मीडियामध्ये काम करीत असलेले पत्रकार, शेतकरी बांधव असे अनेक समाजातील घटक या संकटाशी लढत आहेत. या कोव्हिड योद्ध्यांना धन्यवाद देणारी एखादी ओळ आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये न उच्चारणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत. तो कदाचित एक नवीन विक्रमच ठरेल, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.