वांद्रे (मुंबई) - वांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असे वांद्रे येथील घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वांद्य्रातील घटना अत्यंत दुर्दैवी परराज्यातून आलेल्या कामगारांची तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी.अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढण्यात राज्यातील मंत्री दिसत आहेत. ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे की, जे लोक अडकून आहेत, त्यांची व्यवस्था तुम्ही लगेच केली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.वांद्रे येथे काय झाले ?वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला होता. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हटून बसले होते. हजारो लोकांनी जमून गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी केली. लॉकडाउनची मुदत आजच वाढवण्यात आली आहे. मात्र लोकांचा संयम सुटल्याचे यामध्ये दिसून आले. वांद्रे स्टेशनबाहेर हजारो लोक जमून लांब पल्याची गाड़ी सोडण्याची मागणी करत होते. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून बहुतेक उत्तर प्रदेश, बिहारचे होते. पोलिसांनी सध्या जमाव पांगवला आहे.