विरोधी पक्षनेते अजित पवार माध्यमांसोबत संवाद साधताना मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दोनच दिवसापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले होते. या प्रकरणी काँग्रेस सहित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत उचित कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अद्याप त्यावर काहीच कारवाई न झाल्याने अखेर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी पूर्ण दिवसासाठी कामकाजावर बहिष्कार घातला.
निलंबित करण्याची मागणी : विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला भाजप नेत्यांनी जोडे मारले होते. त्यावरून आम्ही काही मुद्दे उपस्थित केले होते. २ दिवसात अध्यक्ष यांनी जो प्रकार झाला त्याचा निकाल द्यावा, अशी मागणी आम्ही केली होती. पण आम्ही सकाळपासून आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री यांच्याशी चर्चा केली. पण आम्हाला काही उत्तर भेटले नाही. राहुल गांधी यांच्याबाबत जे कृत्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर ज्या आमदारांनी केले होते. त्यांना निदान आजच्या दिवसासाठी निलंबित करा, त्याच बरोबर सभागृहात सुद्धा ज्यांनी अशा घोषणा दिल्या. त्यांनाही निलंबित करा मग ते आमचे आमदार असतील तरी हरकत नाही, असेही सांगितले होते. पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद भेटला नाही. म्हणून आज आम्ही आजच्या कामकाजावर दिवसभरासाठी बहिष्कार घातला असल्याचे पवारांनी सांगितले.
आम्ही पळ नाही काढला :अजित पवार पुढे म्हणाले की, अध्यक्षांनी सर्वांचा विचार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज आम्ही सभागृहात सुद्धा गोंधळ घातला असता. ४ तास आम्ही शांत राहिलो. अध्यक्ष, मुख्यमंत्री यांनी बोलावले तिकडे गेलो. त्यांनी सुद्धा वेळ दिला. जो काही समंजसपणा दाखवायला पाहिजे होता तो आम्ही दाखवला. पण त्यांनी निर्णय घेतला नाही. शेवटी नाईलाजाने आम्ही बहिष्कार घातला. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही सभागृहातून पळ काढला. आम्ही पळ वैगरे काही काढला नाही. आम्ही यांच्यासारखे पळपुटे नाही आहोत. सभागृहात बाका रिकामी ठेवायला आम्हाला मज्जा नाही येत. वरळीला मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या रिकामी होत्या, तेथून कोणी पळ काढला होता, असा टोलाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात माध्यमांसोबत संवाद साधताना यामुळे कामकाजावर बहिष्कार :बाळासाहेब थोरात याप्रकरणी म्हणाले की, विधानभवन परिसरात जे काही घडले ते पुन्हा घडू नये म्हणून ज्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांना निलंबित करावे, अशी आमची साधी मागणी होती. कारण याने एक संदेश महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाईल. त्याच बरोबर आमच्या काही लोकांनी सुद्धा काही गोंधळ अशा पद्धतीचा घातला असेल तर त्याची तपासणी करून त्यांच्यावरही कारवाई करा. पण तसे काही न झाल्याने आम्ही आज कामकाजावर बहिष्कार घातला आहे.
हेही वाचा : Maha Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले! तब्बल 'इतके' तास चालले कामकाज; पावसाळी अधिवेशनाची ठरली तारीख