मुंबई- राज्य सरकारने दिलेले १६ टक्के मराठा आरक्षण व केंद्र सरकारने सवर्णांना जाहीर केलेले १० टक्के आरक्षण यामुळे देशातील आरक्षणाचा कोटा वाढला आहे. यातच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी खुल्या गटाला फक्त ५ टक्के जागा राहत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे मुश्किल होऊन बसले आहे. त्यामळे गुरूवारी खुल्या गटातील काही विद्यार्थी व पालकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणार्या खुल्या गटातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मराठा आरक्षणासह सरसकट आरक्षण पद्धतच बंद करण्यात यावी, असा पवित्रा घेतला.
मराठा समाज व सवर्णांना दिलेल्या आरक्षणामुळे यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के, मागासवर्गीय आरक्षण २५ टक्के, मराठा आरक्षण ८ टक्के, सवर्ण आरक्षण ५ टक्के व विविध सरकारी नोकरीतील कर्मचार्यांच्या मुलांसाठी ७ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी फक्त ५ टक्केच जागा शिल्लक राहत आहेत. त्या तुलनेत खुल्या गटामध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.