मुंबई : तारीख 20 जून 2022, विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. कोण निवडले जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण होते. निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते 'वर्षा' बंगल्यावर जमले होते. त्याचवेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. शिंदे बंड करून सूरतला पोहोचले आणि पुढच्या दहा दिवसांत राज्याचे सारे राजकारणच बदलून गेले. आज त्यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. बंडखोरी होऊन एक वर्ष उलटले तरी राज्याच्या राजकारणावर त्याचा प्रभाव कायम आहे. आज ठाकरे गट 'खोके दिन' साजरा करत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 'गद्दार दिन', तर शिंदे गट 'स्वाभिमान दिन' साजरा करत आहे!
एकनाथ शिंदे यांच्या बंडाची टाइमलाइन :
एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल' : 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर लगेचच एकनाथ शिंदे गायब झाले. ते 'नॉट रिचेबल' होते. काही वेळाने कळले की, शिंदे शिवसेनेच्या इतर 11 आमदारांसह भाजपशासित गुजरातच्या सूरत शहरात आहेत. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीला एकनाथ शिंदेसह तब्बल 10-12 आमदारांनी गैरहजेरी लावली.
शिंदे यांची व्हीप पदावरून हकालपट्टी : त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या व्हीप पदावरून हकालपट्टी केली. शिवसेनेने त्यांचे आणखी आमदार शिंदेंसोबत जाऊ नये म्हणून त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये ठेवले.
शिंदेंनी महाविकास आघाडी सोडण्यास सांगितले : त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अपील केली. शिंदेनी ठाकरेंना 'अनैसर्गिक' महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले. शिंदे यांनी दावा केला की त्यांना 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. कायद्यानुसार, शिंदे यांना 37 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता (एकूण 55 च्या दोन तृतीयांश संख्याबळ), नाहीतर त्यांना पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवले गेले असते.