मुंबई- मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा धोका वाढत चालला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा रोज मृत्यू होत आहेत. आज कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील डॉ. बालिगा नगर येथे राहणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने यामुळे धारावीतील मृतांची संख्या 4 वर पोहचली आहे.
धारावीत कोरोनाचे रोज नवे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वरळीनंतर धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. धारावीत कोरोनाचे एकूण 28 रुग्ण आढळून आले आहेत. येथील डॉ. बलिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवाडा चाळ, सोशल नगर, जनता कॉलनी, कायलन वाडी, पीएमजीपी कॉलनी, मुर्गन चाळ आदी भागात तसेच दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले तबलिगी समाजाचे लोक यांचा रुग्णांमध्ये समावेश आहे.