मुंबई- मुंबईच्या मस्जिद बंदर येथील सय्यद इमारतीला मागील आठवड्यात आग लागली होती. लाकडी इमारत असल्याने म्हाडाकडून या इमारतीचे तोडकाम केले जात होते. तोडकाम सुरु असतानाच इमारतीचा काही भाग कोसळला. त्याखाली ५ कामगार अडकले होते. त्यांना बाहेर काढून जेजे रुग्णालयात दाखल केली असता एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तोडकाम करताना इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू
मुंबईच्या मस्जिद बंदर येथील सय्यद इमारतीला मागील आठवड्यात आग लागली होती. त्या इमारतीचे तोडकाम करत असताना काही भाग कोसळला या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
मस्जिद बंदर नागदेवी क्रॉस लेन येथील सय्यद इमारतीला ३ ऑगस्टला आग लागली होती. ही इमारत लाकडी असल्याने दोन दिवसांनी ५ ऑगस्टला आग विझली. आगीमुळे इमारत धोकादायक झाली होती. यामुळे इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही इमारत म्हाडाची होती. त्यामुळे म्हाडाने इमारतीच्या तोडकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. कंत्राटदारामार्फत इमारतीचे तोड काम सुरू होते. तोडकाम सुरु असताना इमारतीचा काही भाग कोसळला. त्या खाली काही कामगार अडकले होते.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ५ कामगारांना मुंबई अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी २ जखमी कामगारांना जवळच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दाखल केलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.