मुंबई- मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात लागू झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांनी प्रत्येक महाविद्यालयातील प्रवेश हे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाने संस्थाचालकांचे हित जपण्यासाठी मागील ८ वर्षांपासून पदवी, पदव्युत्तर आदीच्या प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन नोंदणीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे. याविषयी विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कायदा अंमलात येऊनही विद्यापीठ आपल्याकडे संपूर्ण प्रवेश का राबवत नाही, असा सवाल केला जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ७९३ वरिष्ठ महाविद्यालये असून यात २६ महाविद्यालयांनी स्वायत्तता घेतली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ३ लाख ३९ हजार ४५५ प्रवेशासाठीच्या जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशसाठी विद्यापीठाकडून ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे. यात केवळ विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रवेश मात्र संबंधित महाविद्यालयांकडेच केले जाते. त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारानुसार अनेक महाविद्यालये प्रवेश देताना अमाप शुल्क वसुली करतात. तर कधी राखीव जागांवर प्रवेश डावलले जात असते. असे असताना त्याकडे विद्यापीठ प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने का केली जात नाही, असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.
या विषयासाठी घेतले जातात प्रवेश
शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठात प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी, बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए, इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी, बीएमएस, बीएमएस-एमबीए, बीकॉम, फायनान्शिअल मार्केट, अकाउंन्टींग, बँकिंग अँड इन्शुअरन्स, मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीएस्सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, हॉस्पीटॅलिटी स्टडी, मायक्रोबायोलॉजी, बायो-केमेस्ट्री, मेरिटाईम, नॉटीकल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, होम सायन्स, एरॉनॉटिक्स, एव्हीएशन, बीएस्सी न हाऊस मॅनेजमेंट, फार्मा अॅनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि लायब्ररी सायन्स आदी विषयासाठी प्रवेश घेतले जातात.