मुंबई- शहरासह संपूर्ण राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तब्बल 126 दिवसानंतर कोरोनाची एका दिवसाची आकडेवारी 8 हजाराच्या घरात पोहोचली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. त्यातच राज्यात नव्या कोरोना प्रकाराचा (स्ट्रेन) शिरकाव झाल्याची चर्चा देखील जोरदार रंगू लागली. मात्र, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राज्यात नवा कोरोना प्रकार नसल्याचे सांगितले आहे.
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू प्रकार नाही; डॉ. तात्याराव लहाने यांची माहिती
कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने राज्यात नव्या कोरोना प्रकाराचा (स्ट्रेन) शिरकाव झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राज्यात नवा कोरोना प्रकार नसल्याचे सांगितले आहे.
राज्यात अमरावती, यतवमाळ, सातारा येथील नमुने आपण ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, त्या अहवालानुसार राज्यात 100 टक्के नवा विषाणू प्रकार आला नाही. मात्र, आपल्या देशात जो 614 नावाचा प्रकार आहे, त्याचे दोन परावर्तित नमुने निदर्शनास आले आहेत. मात्र, या नवीन प्रकारामुळे राज्यात संसर्ग वाढलेला नाही. संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण आपण त्रिसुत्री (मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात धुणे) कार्यक्रम विसरलो आहे. मास्क घालणे आपण विसरलो आहे. त्यामुळे ही आकडेवारी वाढली आहे.
टाळेबंदीसंदर्भात डॉ. तात्याराव लहाने यांचे महत्त्वाचे विधान
आपण दहा महिन्यांची टाळेबंदी पाहिली आहे. टाळेबंदीकडे आपण जायचे का, नाही हे सर्वसामान्यांच्या हातात आहे. आपणच एकमेकांचे पोलीस झाले पाहिजे. जे कुणी मास्क वापरत नाहीत त्यांना मास्क वापरण्यास सांगितले पाहिजे. मात्र, रुग्णसंख्या वाढत गेली तर टाळेबंदी नाईलाजास्तव करावी लागेल. पण, टाळेबंदी हा उपाय नाही, आपण जबाबदारी घेतली तर टाळेबंदीची गरजच पडणार नाही.