मुंबई: आज मुंबईत एकीकडे आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तींयांवर ईडीने ठिकठिकाणी छापे टाकले आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, मुंबई शहरातील कोणत्याही व्यक्तीची सुरक्षा अथवा संरक्षण काढून घेतलेले नाही किंवा कमी केलेले नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी बाळसिंग रजपूत यांनी दिले आहे.
ही केवळ अफवा : गेल्या काही दिवसापूर्वी काही नेत्यांना धमकीचे फोन आल्याचे समोर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार संजय राऊत यांनाही धमकीचे फोन आले होते. आता गृह विभागाने मातोश्री परिसर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती ही केवळ अफवा असल्याचे, मुंबई पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर समोर येत आहे. दोन दिवसापूर्वीच ठाकरे कुटुंबियांतील सुरक्षेत कपात केली असल्याचे बोलले जात होते. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतील एक एस्कॉर्ट व्हॅन काढून घेण्यात आली असल्याची केवळ चर्चा असून, त्यात तथ्य नाही. मातोश्रीवरीलही बंदोबस्त कमी केला आहे ही देखील अफवा आहे.