मुंबई - मध्य प्रदेशमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात घडणार नाही. कारण महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे अभेद्य आहे. त्यामुळे मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. महाराष्ट्राची 'पॉवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन १०० दिवसांपूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवल्याचे राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे.
हेही वाचा - जगभर पसरलेला कोरोना 'साथीचा रोग', जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा
हेही वाचा - कोरोना : भारतात ६८ जणांना कोरोना संसर्ग; सर्व पर्यटक व्हिजा रद्द
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि युवा नेते म्हणून ओळख असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, बहुमत सिद्ध करू, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसने सर्व आमदार सुरक्षिततेसाठी राजस्थानातील जयपूर शहरात हलवले आहेत. या प्रकारानंतर आता महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, हे सरकार अभेद्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.